२८. मोरपिसारा

चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या .

एकदा चिचू म्हणाला, ‘‘आई, काय हा माझा काळा रंग. मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो.’’

त्यावेळी तिथून एक परी चालली होती.तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली.

आई म्हणाली, ‘‘आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो. त्यालाच जाऊन विचार!’’
चिचू पळत रामूकडे नि घाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला.
चिचू म्हणाला, ‘‘मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे.’’

त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली. आणि … चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा, रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा. पण सुंदर!

चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खूश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला.

तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला, अन् … त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर! तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ढुशी देऊन त्या ला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं, म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली अन् नंतर तिला काळजी वाटली. ‘असा उंदीर कधी असतो का!’

‘‘आई, भूक लागली.’’
‘‘बरं! चल आत.’’
‘‘कसा येऊ? पिसारा अडकतोय. मिटता येत नाही.
पिसारा कसला, पसाराच हा!’’
तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला.
‘‘आई, आता झोप आली.’’ खाऊन झाल्यावर तो म्हणाला.

‘‘आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा.’’ चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला.
‘‘आई, मला हा पिसारा नको.’’
असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली.
… आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला! आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं.

-ईशान पुणेकर

———————————————स्वयंअध्ययन——————————————

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.