वडेश बहरला

चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता.फांदीफांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू होते चिनू. कावळीणीचे पिलू होते कानू. पोपटाचे पिलू होते पिनू. पिले लपाछपी खेळत. पारंबी पकडून झोके घेत. खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा.

उडा उंच भूर भूर
जा खूप दूर दूर
करता खूप कटकट
निघा इथून झटपट

पिलांना वडेशचा राग यायचा. ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे
ऐकून पाखरांना वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही. कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले, ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले.
कोवळी पाने दि सू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदीफांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लालचुटुक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली.
ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता.
तो पाखरांना बोलावू लागला.

यारे या, सारे या
चटकन या, पटकन या
लाल लाल फळे खाऊन जा

पाखरे बोलू लागली,

येतो येतो, पटकन येतो
हासत नाचत चटकन येतो
गाणी गात गात येतो.
लाल लाल फळे खातो..


पाखरे वडेशजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप
आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला.

कविता पूर्ण करा.

  • कावळा करतो ———-
  • चिमणी करते ———-
  • कोंबडा बोलतो ———
  • कोकीळ बोले ———–

कोण ते सांग.
(अ) लपाछपी खेळणारी …………………………………………
(आ) पाखरांची भाषा समजणारा …………………………………..

फक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.